स्कोअरग्राफ मिडीया
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रियाताई सुळे आणि माढा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बबनदादा शिंदे यांचे लहान बंधू रमेश शिंदे यांची दिल्लीत भेट झाली असून या भेटीमुळे माढा मतदारसंघात बबन दादा शिंदे यांना घरातूनच आव्हान उभा करण्याचे प्रयत्न केले जात असल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे यांनी अजित पवार यांना पाठिंबा दर्शवला. त्यामुळे माढ्यामध्ये शरद पवार गटासाठी स्पेस निर्माण झाली असून विधानसभेला शरद पवार कोणाला उमेदवारी देतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असतानाच बबनदादा शिंदे यांचे धाकटे बंधू रमेश शिंदे आणि सुप्रिया ताईंची भेट झाल्याने आमदार बबनदादा शिंदे यांना घरातूनच आव्हान दिले जाणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.
रमेश शिंदे हे त्यांचे सुपुत्र धनराज शिंदे यांच्यासाठी फिल्डिंग लावत असल्याची चर्चा असून यंदाच्या निवडणुकीत बबन दादा शिंदेही मुलगा रणजीत शिंदे यांना उमेदवारी देणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे शिंदे कुटुंबात राजकीय फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली असून रणजित शिंदे विरूद्ध धनराज शिंदे अशीही लढत पाहायला मिळू शकते. बबन दादा शिंदे यांचे एक बंधू संजय शिंदे हे सध्या करमाळा मधून आमदार आहेत.

Author: Scoregraph Media



