स्कोअरग्राफ मिडीया
मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत अजून वाढ झाली असून आज कौटुंबिक कोर्टाने करूणा मुंडे यांच्यावर अंशतः घरगुती हिंसाचार झाल्याचे मान्य करत धनंजय मुंडे यांनी करूणा यांना दरमहा पोटगी देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणापासून ते कृषी विभागातील घोटाळ्याच्या आरोपांचे प्रकरण ताजे असतानाच कौटुंबिक कोर्टाने दोषी ठरवल्यामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हे आहेत.
धनंजय मुंडे यांना करुणा मुंडे यांच्यापासून एक मुलगा व एक मुलगी असून करूणा मुंडे पोटगीचा दावा अंशतः जिंकल्यानंतर मुलगा शिशिव मुंडे याने वडिलांची बाजू घेत भावनिक पोस्ट केली आहे.
शिशीव मुंडेने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “माझे वडील जगातील सर्वोत्तम नसले तरी, त्यांनी आम्हा भावंडांना कधीही हानी पोहोचवली नाही. माझी आई विविध कारणांमुळे त्रस्त असायची आणि त्याचा राग ती आमच्यावर काढायची. ती ज्या घरगुती हिंसाचाराबद्दल बोलते, तो प्रत्यक्षात माझ्या, माझ्या बहिणीच्या आणि वडिलांच्या बाबतीत तिच्याकडूनच घडला आहे.
पुढे तो म्हणतो, माझ्या वडिलांना तिच्याकडून होणारा शारीरिक आणि मानसिक त्रास असह्य झाल्यानंतर, त्यांनी तिला सोडले. यानंतर तिने मला आणि माझ्या बहिणीला घर सोडण्यास सांगितले, कारण तिच्या मते आमच्यात काहीही संबंध उरला नव्हता.
शिशीव पुढे लिहितो, २०२० पासून माझे वडील आमची पूर्णपणे काळजी घेत आहेत. माझ्या आईला कोणतीही आर्थिक अडचण नाही, तरीही तिने घराच्या कर्जाचे हप्ते न भरण्याचा निर्णय घेतला आणि माझ्या वडिलांवर खोटे आरोप करून बदला घेण्याचा प्रयत्न करत आहे.

Author: Scoregraph Media



