Scoregraph Media

जगण्याचे रंग उधळताना घ्या खबरदारी… आपल्या रंग उधळण्याने इतरांचे आयुष्य बेरंग होणार नाही याची काळजी घ्या

स्कोअरग्राफ मिडीया – तुषार शेंडे

आज होळी… खरं तर आपल्याकडे होळीपासूनच रंगांची उधळण सुरू होते आणि रंगपंचमी दिवशी हा सण संपतो. तसं पहायला गेलं तर रंगाची आणि आपली ओळख ही लहानपणापासूनचीच. रंगीत खडूने भींतीवर ओडलेल्या उभ्या-आडव्या नागमोड्या रेषा आणि ते पाहून संतापलेल्या बाबांचे लाला भडक डोळे… तर कधी आईने गालात वाजवल्यावर लालबुंद झालेला तो गाल. खरचं किती जवळच नातं आहे ना रंगाचं… आपल्या जगण्याशी, रोजच्या जीवनाशी.

प्रत्येक रंगाचा अर्थ वेगळा, स्वभाव वेगळा… त्याच्या छटाही वेगळ्या. पण आपल्या नकळत हे रंग आपल्या आयुष्याचा, जगण्याचा एक भाग होतात आणि आपलं जगणचं रंगवून टाकतात. पण हे रंग उधळतानाही खबरदारी घेणे मात्र गरजेचे आहे. मग तुम्ही बाजारात असलेले कृत्रिम रंग उधळा किंवा तुमच्या आयुष्याचे.

सध्या बाजारात मिळणा-या या रंगामध्येही विषारी रसायने व धातूंचे घटकच जास्त आढळून येतात. त्यामुळे अनेकदा त्वचेचे विकार, रक्त वाहिन्यांचे रोग, मज्जा संस्थेचे आजार, डोळ्यांचे विकार आदि आजार उद्भवतात. त्यामुळे खबरदारी घेणे खूप महत्वाचंय. पण या रंगाचा एवढाच सबंध आपल्याशी नाही.

अगदी हिरवा म्हटलं की चांगला, प्रगतीचा. लाल प्रेमाचा, काळा वाईट तर पांढरा सात्विकतेचा, केशरी पराक्रमाचा… इतका आपल्या जगण्याशी त्यांचा जवळचा संबंध असतो. ब-याचदा आपण काही न बोलताही आपल्या चेह-यावरचे रंग बरच काही सांगून जातात.

पण अलीकडे आपण बरेच रंग उधळताना दिसतोय? नाही का? नको ते उद्योग करून इतरांच्या आयुष्यातील रंग उडवतोय. त्यांचं आयुष्य बेरंग करण्याचा प्रयत्न करतोय…आज होळी व त्यानंतर धुळवड. पण या धुळवडीमध्ये अनेकजण इतके रंग उधळतात की विचारू नका. अनेकजण रंग उधळताना इतके बेभान होतात की विचारू नका.अनेकांनी तर रंग उधळण्यापूर्वीच ताल सोडलेला असतो. स्वतःहून हेच जमिनीवरच्या वेगवेगळ्या रंगात पडत असतात. पण खरचं ही रंगाची चूक आहे का? रंग उधळण्याची नशा इतकी सुंदर असताना त्यात वेगळ्या नशेची गरजच आपल्याला का वाटते? हल्लीची तरूण मुलंही यामध्ये कमी नाहीत. खरचं खबरदारी घेणे खूप गरजेचं आहे. होळी पंचमीच्या रंगांसोबतच आपल्या आयुष्याचे रंग उधळतानाही ही खबरदारी तितकीच महत्त्वाची…

माणसाचं संपूर्ण आयुष्यचं रंगानी व्यापलं असताना मनातील सर्व अमंगल, सर्व वाईट सवयी, विचार होळीत जाळून आपल्या व आपल्या प्रिय माणसाच्या आयुष्यात आनंदाचे रंग भरणे सोडून कुठल्या दिशेनं चाललोय आपण? आपल्या कुटुंबाच्या, प्रियजणांच्या आयुष्यात आनंदाचे, उत्साहाचे रंग भरण्याऐवजी दुसय्राचे आयुष्य बेरंग करण्यात लोकं एवढा वेळ खर्ची घालत आहेत की विचारू नका…

आज गोरा रंग तर एवढा भाव खाऊन जातोय की काही बोलायचे काम नाही? काळा सावळा रंग म्हटलं की समोरच्याला इतकं का कमी लेखतात माणसं? याचा अर्थ फक्त गो-या रंगाच्याच माणसांना अक्कल असते असा होतो का? काळ्या, सावळ्या रंगाच्या मुलींची व मुलांची लग्नही लवकर जमत नाहीत असं पहायला मिळते. मग त्याच्या कलागुणांना, गुणवत्तेला काहीच महत्व नाही का? आपण नेमके कोणते रंग शोधतोय? आयुष्य खूप सुंदरय… त्यात आनंदाचे, उत्साहाचे, आपुलकीचे व प्रेमाचे रंग भरा. चुकीचे रंग उधळू नका.. भुर्रकट विचारांचा हात सोडून नव्या जोमानं आणि नव्या रंगानी आपल्या मनाचे कप्पे भरा. त्यासाठी मनापासून प्रयत्न करा. जगण्याचे सारे रंग अनुभवा पण चुकीचे रंग विचाराच्या स्वरूपात मनाच्या कप्प्यात साठणार नाहीत याची आवर्जून खबरदारी घ्या. आपण उधळत असलेल्या नको त्या रंगांमुळे समाजाचे, इतरांचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्या आणि आयुष्य अधिक सुंदर बनवा याच होळीच्या व येणाऱ्या रंगपंचमीच्या टीम स्कोअरग्राफ कडून मनःपूर्वक शुभेच्छा…!!!

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज