Scoregraph Media

अजित पवारांमुळे खरंच महायुतीचा पराभव झाला का? वाचा सविस्तर दादा गटाचे खच्चीकरण कोण करतय?

स्कोअरग्राफ मीडिया – तुषार शेंडे

अजित पवारांना सोबत घेतल्याने भाजपची महाराष्ट्रात पीछेहाट झाली असे नॅरेटीव सध्या सेट केले जात आहे. शिंदे गट व भाजपच्या आमदारांकडून पराभवाचे खापर अप्रत्यक्षरीत्या अजित पवार गटावर फोडले जात असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. विजय झाला की आमच्यामुळे आणि पराभव झाला की तो अजित पवारांना सोबत घेतल्याने असे नॅरेटीव सेट करून अजित पवार गटावर खापर फोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. यातून अजित पवारांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न होतोय का? होत असेल तर नेमकं कोण हा प्रयत्न करतेय? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. संघाच्या मुखपत्रातूनही अजित पवारांना सोबत घेतल्याने भाजपचा पराभव झाल्याची मांडणी करण्यात आली. परंतु वस्तुस्थिती नेमकी काय आहे. खरंच अजित पवारांमुळे महायुतीचा पराभव झाला आहे का याचा आढावा घेण्याचा प्रयत्न स्कोअरग्राफ मीडियाने केला आहे.

महाराष्ट्रात एकूण 48 पैकी 17 जागांवर महायुतीला विजय मिळाला. 48 पैकी भाजपाने 28 जागा लढवल्या. शिंदे गटाने 15 तर अजित पवार गटाने चार जागा व महादेव जानकर यांनी अजित पवारांच्या कोट्यातून परभणीची एक जागा लढवली. अठ्ठावीस पैकी भाजपा फक्त नऊ जागांवर विजयी झाली. या 28 जागांचा जर विचार केला तर आपल्याला असे दिसून येते की, भाजपने ज्या 28 जागा लढवल्या त्यापैकी 14 मतदारसंघात अजित पवार गटाचे 22 आमदार होते. याच 14 मतदारसंघात भाजपाचे 26 आमदार होते. या 14 मतदारसंघांची आकडेवारी तपासली असता असे निदर्शनास येते की 22 पैकी 11 विधानसभा मतदारसंघात अजित पवार गटाच्या आमदारांनी भाजपला लीड मिळवून दिले आहे. याच 14 मतदारसंघात भाजपच्याही 26 पैकी फक्त तेराच आमदारांनी भाजपच्या उमेदवाराला लीड मिळवून दिले आहे. म्हणजे अजित पवार गट व भाजपच्या आमदारांचा परफॉर्मन्स समान आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघात अनिल पाटील, पुण्यात सुनील टिंगरे यांची भाजप उमेदवाराला मोठी मदत झाली आहे. 

दिंडोरी लोकसभा मतदारसंघात अजित पवार गटाचे चार आमदार आहेत. या चार पैकी एकाही आमदाराने भाजपच्या भारती पवारांना लीड दिलेले नाही यावरून अजित पवार गटावर आरोप केला जात आहे.

परंतु जर आपण बीडची परिस्थिती पाहिली तर बीडमध्ये अजित पवार गटाच्या तीनही आमदारांनी भाजपच्या पंकजा मुंडे यांना लीड दिलेले आहे. याउलट भाजपचे आमदार असलेल्या गेवराई आणि केज या विधानसभा मतदारसंघातून शरद पवार गटाच्या बजरंग सोनवणे यांना लीड मिळालेले आहे. लातूर लोकसभेत सुद्धा अजित पवार गटाच्या दोन्ही आमदारांनी भाजपचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांना लीड मिळवून दिले आहे. याव्यतिरिक्त इतर कोणत्याच विधानसभा मतदारसंघात सुधाकर शृंगारे यांना लीड मिळालेले नाही. भाजपचा आमदार असलेल्या मतदार संघातही नाही. त्यामुळे महाराष्ट्रात भाजपचे पानिपत अजित पवारांमुळे झाले हा दावा खोटा वाटतो. याउलट अजित पवार सोबत नसते तर भाजपचे काय झाले असते हा विचार न केलेलाच बरा.

त्यामुळे आकडेवारी पाहता भाजपचा पराभव अजित पवारांमुळे झाला नाही हे अधोरेखित होते. तसेच राजस्थान व उत्तर प्रदेश या ठिकाणीही भाजपला मोठा फटका बसला आहे आणि त्या दोन्ही ठिकाणी अजित पवारांचा संबंध नव्हता. पण तरीसुद्धा महाराष्ट्रातील पराभवाला अजित पवार गटाला जबाबदार ठरवण्याचा अप्रत्यक्ष प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे अजित पवार गटावर ठपका ठेवून अजित पवारांची ब्रँड व्हॅल्यू कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय का? अजित पवारांचे खच्चीकरण नेमकं कोण करतय? विधानसभेत अजित पवारांची बार्गेनिंग पावर कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय का? हे नवीन प्रश्न निर्माण होतात.

Spread the love

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज

[democracy id="1"]