स्कोअरग्राफ मिडीया
निमगाव केतकी – वरकुटे खुर्द रस्त्यावरील निरा डावा कालव्यावरील ब्रिटिश कालीन तीन पूल येथे मागील तीन ते चार वर्षांपूर्वी रस्त्याचे काम करत असताना रस्त्याची उंची वाढविल्यापासून अवजड वाहनांना वाहतूक करताना अडथळा निर्माण होत असून तीन पुलास दीडशेहून अधिक वर्ष झाले असून तो ब्रिटिश कालीन पूल आहे तसेच निरा डावा कालव्यास पाणी आल्यानंतर त्यातून गळतीही मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे या पुलाचे नूतनीकरण करून व रस्त्याची उंची व पुलाची उंची यांचे योग्य ते नियोजन करून अवजड वाहनांना अडथळा निर्माण होणार नाही अशा पद्धतीने रस्ता करावा अशी मागणी व वरकुटे खुर्द व काटी परिसरातील शेतकरी करीत आहेत.
निमगाव केतकी – वरकुटे खुर्द हा रस्ता काटी, रेडा, रेडणी तसेच निराभिमा सहकारी साखर कारखाना आदी भागांना जोडणारा मुख्य रस्ता असून या सर्व परिसरात ऊस व फळबागांचे क्षेत्र ही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे फळ तोडणी झाल्यानंतर मोठे ट्रक तसेच उसाचे ट्रॅक्टर, चाऱ्याचे ट्रॅक्टर यांना या पुलाखालून जाताना कमी उंचीमुळे जाता येत नाही व त्यामुळे पर्यायी फार दूरच्या मार्गांचा वापर करावा लागतो. तसेच वरकुटे खुर्द व पिटकेश्वर या दोन गावांना जोडणारा रस्ता ही नसल्याने पिटकेश्वर वरूनही पर्यायी मार्ग वापरता येत नाही.
सध्या राज्यात भाजप, राष्ट्रवादी व शिवसेना यांचे सरकार असल्याने विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी या पुलाचा प्रश्न मार्गी लावावा असेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
पावसाळ्यात या पुलाखालून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने व वरून निरा डावा कालवा ही वाहत असल्याने या ठिकाणाहून प्रवास करताना धोका निर्माण होतो. तसेच अनेकदा दोन- दोन तीन -तीन दिवस वाहतूक बंद ठेवावी लागते. त्यामुळे या पुलाचे नूतनीकरण करून नवीन पूल बांधण्यात यावा व पुलाची आणि रस्त्याची उंची याचे योग्य ते नियोजन करावे अशी मागणी या भागातील शेतकरी करीत आहेत.

Author: Scoregraph Media



