पुणे प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. पुण्यातील तापमानात सातत्याने घट होत असून 18 डिसेंबरपासून तापमानात आणखी घट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
18 डिसेंबरपासून राज्यात उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा प्रभाव जाणवण्याची शक्यता असून या वेळी तापमानात आणखी 2 अंशांची घट होण्याची शक्यता आहे. पुणे शहरातही तापमानात घट होणार आहे, असे हवामान खात्याने सांगितले आहे.
10 डिसेंबर रोजी सरासरीपेक्षा 4 अंश सेल्सिअस ने अधिक असलेले शहराचे किमान तापमान 14 डिसेंबरपर्यंत 2 अंश सेल्सिअसने घटलं आहे. त्याचप्रमाणे 12 ते 14 डिसेंबर दरम्यान कमाल तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसने घट झाली. 12 डिसेंबरला कमाल तापमान 31.4 अंश सेल्सिअस होते, तर 14 डिसेंबरला ते 28.8 अंश सेल्सिअस पर्यंत खाली आले आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात अवकाळी पावसाचं वादळ थांबलं आहे. आता सौम्य हिवाळा सुरू झाला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईच्या किमान तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे. उत्तरेकडील वाऱ्यांमुळे रात्रीचे तापमान 18 ते 19 अंश सेल्सिअस पर्यंत घसरेल. त्यामुळे मुंबईकरांना रात्री थंडीचा आनंद लुटता येणार आहे.
वास्तविक, मुंबईकर थंडीची वाट पाहत असले तरी त्यांना दररोज दमट उष्णतेचा सामना करावा लागतो. उपनगरात किमान तापमान 21 ते 22 अंश सेल्सिअस दरम्यान होते. प्रादेशिक हवामान खात्याच्या अंदाजानुसार 12, 13 आणि 14 डिसेंबर रोजी रात्रीचे तापमान 20 अंश सेल्सिअस पर्यंत घसरेल.
15 आणि 16 डिसेंबर रोजी तापमान 19 अंश सेल्सिअस राहील. उत्तरेकडून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या थंड वाऱ्यांचा वेग वाढणार असल्याचे हवामान खात्याचे संचालक सुनील कांबळे यांनी सांगितलं. त्यामुळे रात्रीचं तापमान कमी होईल.

Author: Scoregraph Media



