Scoregraph Media

प्रवास तरूणाईचा – आभासी प्रेम की खरेखुरे करियर?

स्कोअरग्राफ मिडीया, पुणे

भाग – 01 आभासी प्रेम की खरेखुरे करियर?

तसं पाहिले तर वय वर्ष 16 ते वय वर्ष 24 ही आपल्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची वर्ष असतात.. हीच ती वर्ष असतात जे ठरवतात, आपण आयुष्यभर आनंदात जगणार की काळजीत ? आपण सर्व सुख सोयींनी भरलेल्या अशा आयुष्यात जगणार की आयुष्य अड्जस्ट करत ? या वयाला आयुष्यात जो माणूस सिरीयसली घेतो तो नक्कीच एक उत्तम आयुष्य जगतो. चांगले यश संपादन करतो. पण हेच वर्ष असतं जे नवीन प्रेमाची, आकर्षणाची ओळख करून देत.

अलीकडील पिढ्यांना प्रेम ही भावना खूप कमी वयात समजू लागलीये आणि ही लहान वयाची मुलं आकर्षणालाच प्रेम समजू लागलीत . सोशल मीडियाच्या 30 सेकंदाच्या रील्सच्या प्रभावात येऊन प्रेमाची व्याख्या ठरवणारी ही पिढी आहे आणि या आकर्षण आणि प्रेम या खेळाच्या नादात उध्वस्त होतं ते करिअर.. आणि त्यानंतरचा पुढचा टप्पा असतो प्रेमात झालेली फसवणूक , काही ठिकाणी मिळालेला नकार , आणि या सगळ्यात वेळ कसा निघून जातो आणि वय कसं कसं वाढतं हे लक्षात येत नाही.. आणि मग ना धड प्रेम मिळालेल असतं आणि ना करिअर आणि या सगळ्याच्या नादात वाट्याला येतं ते डिप्रेशन…
आणि हे सगळं होत असताना अलीकडील तीन ते चार वर्षाच्या काळात कानावर सतत काहीतरी बातम्या येत आहेत . मग ते सरस्वती वैद्य प्रकरण असू द्या, दिल्लीच साहिल साक्षी प्रकरण असू द्या , पुण्यातील एमपीएससी मधून यशस्वी झालेली दर्शना पवार असुद्यात या सर्व प्रकरणांचा जर मूळ पाहिलं तर ते आहे प्रेम, संशय, फसवणूक , आणि मिळालेला नकार… या तिन्ही प्रकरणांचा बारकाईने अभ्यास केला तर जाणवतं की वय आणि फसवणूक याचा काही संबंध नाही. सरस्वती वैद्य यांचं वय जास्त होतं तर साक्षीचे वय कमी होतं… दर्शना पवार ने तर नुकताच अवघड अशा परीक्षेमधून यश संपादन केलं होतं. या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. पण तरीही अशा घटना वय वर्ष 30 च्या आतील मुलींसोबत जास्त घडतात, पालक आणि पाल्य यांच्यामधील नसलेला संवाद, त्यामुळे मुलांमुलीच्या वैयक्तिक आयुष्यात काय चाललंय याचा पालकांना सुगावा नसतो .. प्रत्येक पालकाला हेच वाटतं की आपला मुलगा किंवा मुलगी असं काही करू शकत नाही.. प्रेमाला पापच समजलं जातं अशी भावना घरामध्ये निर्माण केली जाते. आणि मग मुलांचं सुरू होतं आपलं प्रेम प्रकरण लपवणं आणि त्यानंतर सर्वात मोठा खड्डा म्हणजे होणारी फसवणूक आणि मिळणारा नकार . या अशा प्रकरणांमधून आज महाराष्ट्रामध्ये मुली हरवण्याचा प्रकरण खूप जास्त वाढत चालले आहे. महाराष्ट्र पोलीस यांच्या माहितीनुसार राज्य महिला आयोग अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी घेतलेल्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये फक्त एक जानेवारी 2023 ते मार्च 2023 दरम्यान 16 ते 35 वयोगटातील 3594 महिला या मिसिंग आहेत… या मिसिंगला अनेक कारणे असतील . परंतु सर्वात महत्त्वाचा फॅक्टर हा प्रेम आणि आकर्षण हे आहे असे मला वाटते. आत्ता सध्याच्या काळामध्ये या गोष्टींवर फक्त चर्चा आणि हळहळ व्यक्त करून चालणार नाही तर हे प्रकार वाढू नयेत असं वाटत असेल तर सर्वात महत्त्वाचं आहे 16 ते 25 या वयोगटातील मुला मुलींचे समुपदेशन करणं.

सर्वात महत्त्वाचं करियर आहे हे या वयोगटातील युवक युवतींना समजावून सांगणं . यासाठी महाराष्ट्रभर अनेक कार्यशाळा घेणे गरजेचे आहे.आज समाज म्हणून सर्वांनी पुढे येऊन आत्ताच्या वयोगटातील मुलांवर सर्कशीतल्या रिंग मास्टर सारखं लक्ष न ठेवता त्यांना प्रेमाने या विषयाची ओळख करून देणे गरजेचे आहे आणि जर समाज म्हणून आपण फक्त या आकड्यांकडेच पाहत राहिलो तर या 3000 चे 30000 व्हायला वेळ लागणार नाही. (क्रमशः)

सायली धनाबाई, पुणे

 

Spread the love

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज

[democracy id="1"]