इंदापूर – तुषार शेंडे
तसा तो मोठ्या घरात जन्माला आलेला. कुटुंबाला मोठा राजकीय वारसा असलेला. तो राजकारणात आणि उद्योग व्यवसायात जेवढा रमतो, त्याहून अधिक तो निसर्गात रमतो. पशुपक्षी, प्राणीमात्रांसाठी राबतो. निसर्ग कधी धोका देत नाही, विश्वासघात करीत नाही म्हणून आपण माणसांपेक्षा पक्षी, प्राण्यांवर जास्त प्रेम करतो असे तो सांगतो. वनांमध्ये फिरणे, पक्षी प्राण्यांचे फोटो, माहिती जमा करणे, चिमण्यांसाठी घरटी बनवणे, चिंकारा वाचवण्यासाठी प्रयत्न करणे, प्रसंगी आंदोलन करणे हे त्याचे छंद. आतापर्यंत त्याने हजारो सापांना जीवदान दिले आहे. कधी कोणाच्या घरात, शेतात, कुठेही कसलाही साप कोणालाही दिसू द्यात तुम्ही निसंकोच फोन करायचा… कितीही वाजले तरी हा पट्ट्या हजर होतो व सापाला पकडून वनात सोडून देतो. निमगाव केतकी (तालुका इंदापूर) येथील या अवलियाचे नाव आहे वैभव सर्जेराव जाधव.
वैभव जाधव यांच्या कुटुंबाला मोठी राजकीय पार्श्वभूमी. मोठमोठी राजकीय पदे कायम या कुटुंबात रेंगाळतात.वैभवने उद्योग व्यवसायासोबत स्वतःला राजकारणात आजमावले. पण तो अधिक रमला मात्र निसर्गात. निमगाव केतकी येथील फ्रेंड्स ऑफ नेचर क्लबच्या माध्यमातून होणाऱ्या कामातील त्याचा सहभाग असो अथवा पक्षी तज्ञ डाॅ. विश्वजीत नाईक व पर्यावरण तज्ञ सुरेशचंद्र वारघडे यांच्या मार्गदर्शनाखाली चिमण्यांसाठी आर्टीफिशियल घरटी, वॉटर फीडर व फूड फीडर बनवणे असो या कामात वैभव कायम अग्रेसर राहिला आहे. वैभव जाधव व त्यांचे चुलत बंधू लालासो जाधव यांनी स्वतः जाऊन जळगाव, ठाणे, सावंतवाडी, सोलापूर, बार्शी, इंदापूर अशा विविध ठिकाणी हजारो विद्यार्थ्यांना कृत्रिम घरटी बनवण्याचे प्रशिक्षण दिले आहे.
सर्पमित्र म्हणूनही वैभवचे काम वाखाणण्याजोगे आहे. रात्री अपरात्री कुठेही साप निघू द्यात, लोक वैभव ला फोन करतात. वैभव जातो, आपल्या कौशल्याने साप पकडतो व वनात नेऊन सोडून देतो. धामण, अजगर, घोणस, कोब्रा व अशा अनेक प्रकारच्या सापांना वैभवने लोक वस्तीतून पकडून वनात सोडून दिले आहे. आणि विशेष बाब म्हणजे या कामासाठी तो कसल्याही प्रकारचे पैसे घेत नाही.
वैयक्तिक स्वार्थाने बरबटलेल्या आजच्या काळात वैभव सारखी माणसे निस्वार्थीपणे निसर्गाची सेवा करीत आहेत आणि अशी माणसेच या निसर्गाची खरी संपत्ती आहेत. कमी अधिक प्रमाणात निसर्ग संवर्धनाचे काम करणाऱ्या सर्वांनाच वैभवच्या या कामातून प्रेरणा मिळो आणि निसर्गाचे हे वैभव टिकून राहण्यासाठी अधिकाधिक लोकांचा हातभार लागो. वैभव जाधव यांना हे कार्य निरंतर चालू ठेवण्यासाठी टीम स्कोअरग्राफ कडून खूप खूप शुभेच्छा.

Author: Scoregraph Media



